Back

बातम्या

माळी समाज महासंपर्क अभियानाची नागपूर येथून दमदार सुरवात



Date: 15-May-2022


 

संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती माता सावित्रीआई फुले यांचा वारसा माळी समाजाला लाभला आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून माळी समाजाचे सशक्त संघटण व्हावे या करीता माळी महासंघ ची स्थापना १९८२ साली करण्यात आली होती. संघटन शक्ती ,संचय ,समन्वय व सहभाग या चतुःसुत्री चा अंगीकार करून माळी महासंघ ची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्रात माळी समाज हा संख्येने दोन नंबर वर असून देशाच्या जडणघडणीत माळी समाजाचे फार मोठे योगदान आहे . स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होऊन देखील  महाराष्ट्रातील माळी समाजाला बेरोजगारी सोबतच  राजकीय  , शेतीविषयक ,औद्योगिक , सांस्कृतिक क्षेत्रातील  मूलभूत समस्यांचा सातत्याने सामना करावा लागतो.  
महाराष्ट्रात माळी समाज हा पूर्व विदर्भ .पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , मुंबई-कोकण या सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात विभागाला गेला आहे , त्यामुळे समाजातील समस्या सुद्धा विभाग निहाय विभागल्या गेल्या आहेत. या सर्व समस्या जाणून घेण्याकरीता  माळी महासंघ तर्फे संघटनेच्या  स्थापना दिनापासून माळी समाजातील एक लाख कुंटुंबांशी संवाद साधण्याकरीता माळी समाज महासंपर्क अभियान राबवण्या येत आहे.
या महासंपर्क अभियाना अंतर्गत माळी महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अविनाश ठाकरे महाराष्ट्रातील सर्व विभागाचा दौरा करून माळी समाज बांधवांसोबत संवाद साधणार आहेत. दिनांक १५ मे ते ३१ मे दरम्यान या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून व  रविवार दि. १५ मे रोजी सकाळी १० वाजता सावता सांस्कृतिक भवन शाहू नगर बेसा मानेवाडा रोड नागपूर येथून हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत माळी महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत या दौऱ्याची सुरवात झाली.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात ओबीसी राजकीय  आरक्षणाची ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. माळी समाज हा ओबीसी मधील सर्वात मोठा घटक आहे, या दौऱ्या दरम्यान राजकीय आरक्षण संबंधी व्यापक जनजागृती होणार आहे.
माळी समाज महाराष्ट्रात संख्येने दुसऱ्या क्रमांकावर असून सुद्धा राजकीय क्षेत्रात अपेक्षित भरारी घेऊ शकला नाही, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्थानीक  स्वराज्य संस्थांच्या  निवडणूका होणार आहे. या निवडणुकांमधे माळी  समाजाला  योग्य प्रतिनिधित्व मिळावं आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे या करीता नियोजन करण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात माळी समाजाने मोठी भरारी घेतली आहे, परंतु काळाच्या ओघात शिक्षित तरुणांसमोर बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकला आहे. नोकऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे व सरकारी योजनांचा फायदा घेऊन उद्योग सुरु करावे या करीता या दौऱ्यामध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
माळी समाज हा शेतीशी निगडित समाज आहे . सरकारी योजनांचा लाभ घेऊन फायदेशीर शेती कशी करता येईल, शेतीवर आधारित उद्योग कसे सुरु करता येईल या विषयावर सुद्धा या दौऱ्यात जनजागृती करण्यात येईल.
या शिवाय व्यावसायिक शिक्षण, सहकार क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील संधी या विषयावर समाज बांधवांसोबत संवाद करून समाजाच्या विकासाचे एक व्हिजन डॉक्युमेंट या महा संपर्क अभियानाच्या माध्यमातून माळी महासंघ तयार करणार आहे.
कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष मा. अरुणराव तिखे, राष्ट्रीय सरचिटणीस मा. रवींद्र अंबाडकर,राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. नानासाहेब कांडलकर, पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष मा. चंद्रकांत बोरकर, कार्याध्यक्ष मा. मुकुंदराव पोटदुखे, महिला आघाडी अध्यक्ष मा. सुलेखा पवार, महासचिव मा. धनश्री पाटील, प्रदेश अध्यक्ष वैद्यकीय आघाडी मा, डॉ. संजय घाटे, शिक्षक आघाडी कार्याध्यक्ष पूर विदर्भ मा. कपिल उमाळे, युवा आघाडी कार्याध्यक्ष पूर्व विदर्भ मा. राहुल पलाडे, जिल्हा अध्यक्ष श्री. प्रमोद हत्ती, श्री. बाळकृष्ण येनकर  या समवेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशवस्वी आयोजन करीत शहर अध्यक्ष श्री शंकरराव चौधरी, महासचिव श्री. राजेंद्र पाटील,युवा आघाडी अध्यक्ष श्री. सागर घाटोळ,महिला आघाडी अध्यक्ष सौ. विजया आंबेडकर समवेत इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.